Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

हितगुज

कुणी समजून घेत नाही
याची खंत कधीच नव्हती
मीच कुणाशी बोलत नाही
हा आरोप लोकच करतात.

रानफुलातला, प्राजक्तातला फरक त्यांना कळतो,
पाखराताला, फुलपाखरातला फरक त्यांना कळतो,
मग हे का नाही कळत त्यांना की
प्रत्येक माणसाच्या साच्यातही फरक असतो.

हळवे डोळे नेहमी रडवेच नसतात
स्वप्न घेऊन ते ही जगतच असतात,
बंद ओठांची माणसं मूक नसतात खरी
त्यांच्याही मनात वावटळं असतात.

मी तोंड उघडत नाही
दाताखाली जीभ येऊ नये म्हणून,
डोळे वर करून पाहत नाही
प्रकाशाने दिपून जाऊ नये म्हणून.

हसत नाही, कुणी रडू नये म्हणून
रडत नाही, कुणी हसू नये म्हणून
सोबत करत नाही, जाता येत नाही म्हणून
थांबून राहत नाही, थांबता येत नाही म्हणून.

मी तुमच्यातला आहे हे धरून चालू नका,
वाळीत टाका पण टोचून मारू नका.
हळवेपण आटणार नाही, एकटेपण घटणार नाही,
मारून मुटकून मला पठडीतला माणूस बनवू नका.

वारी

हाक वारीची आली, पावलं निघाली
वरसाची ताटातूट, जिवाला लागली

सोबती झाले गोळा, गळाभेट झाली
भारावली मनं, पालखी घेतली.

जनाई मुक्ताई, सोबत माऊली,
नामा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली,

भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली
केला विठूचा कल्लोळ, दिंडी पंढरी चालली.

टाळ मृदुंगाचा दंगा, हरी नामाचा गजर.
झुले पालखीची झूल, उते प्रेमाचा बहर.

अबिर गुलालाचा रंग, अभंगाचा जोर.
पाहाया पांडुरंग, मन जाहले अधिर.

चालू पंढरीची वाट, खेळू फुगडी रिंगण.
शेवट विसावा, चंद्रभागेचे अंगण.

नाम्याच्या पायरी, भक्तीचं लिंपण.
सावळ्या पाऊली, कैवल्य शिंपण.

हात जोडूनि मागतो, देवा विसर न व्हावा.
जन्म घडो पुन्हा पुन्हा, व्हावी वारीची सेवा.

पुढे परतुनी येऊ, आता निरोप असावा.
जनी विठ्ठल दिसावा, मनी विठ्ठल रुजावा.

तुझं येणं हल्ली अनियमित झालंय हं, माझ्या मनातल्या वावटळां सारखं.

कधी गार वारा, कधी गारा, कधी उजळ कधी वादळ, हे काय वेड्यासारखं ?

जा म्हंटलं काय थांब  म्हंटलं काय, स्वतःचंच खरं करशील,

माझ्यासाठी येतोस ना तू, कीती रे त्रास देशील?
 

तू आलास की ताप होतो, संताप होतो,

भावनांची वादळं उठतात, वणवे पेटतात.

तू आलास की मन फार होतं, गार होतं,

अश्रूंचे बांध फुटतात, ऋतु फुलतात.
 

तू नाही म्हंटलं तरी येतोस, हट्टी मित्रासारखा

चिडवतोस रडवतोस हसवतोस जगवतोस.

टपली मारुन अडवतोस, हात धरुन चालवतोस,

मुलांचा गोंधळ होतोस, तपस्व्याचं मौन होतोस.
 

वाटतं तुझ्याशी भांडावं, तुला मार मार मारावं,

तुझ्यापासून लपावं, शुष्क सुकून जळून जावं.

वाटतं तुझ्या सोबत असावं, तुला नुसतंच पाहात रहावं,

तुझा हात धरुन धारेत शिरावं, भिजत भिजत गळून जावं.
 
 

चातकाच्या आधी तू माझ्याकडे ये, सागराच्या आधी तू माझ्याकडे ये,

ढेकळाच्या आधी तू माझ्याकडे ये, आभाळातनं आधी तू माझ्याकडे ये.

या वेळी येतानाही वेगळेपणानं ये, त्याचं जिवाभावाच्या आगळेपणानं ये.

मी रुसलो चिडलो तरी तुझाच, तू माझाचं. त्याच हक्काच्या  भाबडेपणानं  ये.

 

आला की भवती फेर धर, बरा वेडापिसा हो जोर धर,

मी पण थोडा रागाने म्हणेन ” अरे अरे जरा धीर धर”,

मी बाहेर आलो नाही तर तू आत ये. मला घरातून उचल,

एक मस्तपैकी टपली मार, म्हण, ” ए शहाण्या भिजायला चल”

पुन्हा एकदा उजाडतय बाहेर

माझ्या मनातला काळोख तसाच ठेवून,
शिरतोय एका नव्या दिवसात, नव्या वर्षात मी,
माझ्या न सुटलेल्या प्रश्नांचं गाठोडं घेवून.

सभोवती जल्लोष, चैतन्य, आनंद आहे
मी पाहातोय एकटक अलिप्तपणे,
सभोवती आक्रोश, दु:ख, रुदन आहे
अनुभवतोय थोड्याफार फरकाने.
धडधडत वणव्यासारखं जळता येत नाही
गात्र थंड गार, पेट घेत नाहीत,
शिळा होवून अचेतन पडून राहता येत नाही
प्रश्नांचा जाळ, आतली आग शांत होवू देत नाही.
हसता येत नाही स्वतःवरच. प्रश्न गहन आहे
कस म्हणावं, आयुष्य खुळा खेळ आहे,
स्वतःभोवती स्वतःच गुरफटवलेला प्रश्नांचा गुंता, उगीचच
खरच आयुष्य खुळा खेळ आहे.
दिसामासांच्या समिधा होतात
धग वाढत वाढत चालली आहे,
विचाराची राख सगळीकडे पसरत
काजळी काळोख वाढवत चालली आहे.
सूर्य उगवतोय उगवू दे, रात्र होतेय होवू दे
शतपट ताप आणि काळोख मी उरात घेवून जगतोय,
तुम्ही आज जागलेले पुन्हा झोपाल, उजाडलेले काळोखाल
मी माझ्या उजाडण्याची, शाश्वताची वाट बघतोय.

माझंच तर चुकतयं

घरातलं घरपण जाणवत नाही हल्ली

नात्यातलं नातं तरी कुठं जाणवतय?

पण चुकतय कोण ? मीच !

नेहमी माझंच, हो माझंच तर चुकतयं.

नाही ! नाही जाणवत घर त्या चार भिंतीत

आणि नाही रमत मन चारच माणसात स्वार्थीपणे,

पण नाही देता येत स्पष्टीकरण या सगळ्याचं मला

मग कबूल करतो मी, माझंच तर चुकतयं.

मी लहान होत असताना चार भिंतीं खूप मोठ्या होतात,

आणि चारच नाती, पण किती अंगावर येतात,

नेति नेति म्हणत म्हणे ब्रह्माचा शोध चाललाय,

कशाचं काय ? जाणवतय मला काहीतरी चुकतय.

गुंता आणि घुसमट काही नवीन नाही मला

पण प्रयत्नाने घेतोय प्रत्येक श्वास आता सेकंदभर जास्त

कुणाला समजावायला जाणार कोण चुकतं ते,

म्हणून माझं मीच कबूल करुन टाकलय, माझंच चुकतयं !

तू म्हणतेस खरं पावसात जाऊया म्हणुन,

पण खरंच भिजायला जायचंय का?

ऑफिस मधली वेळ थोडी मागेपुढे होईल ग,

पुन्हा कधीतरी जाऊया, चालेल का?

तिशी पंचविशीत आलो आपण,

आता आपलं भिजायचं वय आहे का?

लोक पाहातील, कपडे भिजतील, वर सर्दी-ताप,

कशाला अकारण त्रास आणि आजारपण, नाही का?

बीच वर आताशा किती गर्दी असते, उगीचच!

त्यात चालायचीही सवय नाही, कंटाळणार नाहीस का?

भुट्टा, बर्फाचा गोळा, आजकाल अन्हायजिनीक असतात म्हणे,

डॉक्टर म्हणाले बाहेरचं खाऊ नका, विसरलीस का?

ट्रेकिंग, वॉटरफॉल, नको रे बाबा,

किती रिस्की असतं ते, स्लिपरी वगेरे,

रिसॉर्ट, पूल म्हणजे बेडकांएवजी बेवडयांच्या आरो़ळ्या,

ह्या सगळ्यात तुला भिजायला जायचंय का?

त्यापेक्षा तू घरीच थांब, सन्डे प्लान करुया का?

पाऊस नसला तर लंच बाहेर करुया का?

पावसांच्या कवितांची मी सीडी आणली आहे, लेटेस्ट,

घरात बसून दोघे जण पाऊस एन्जॉय करुया का?

अगदी हाकेवरच असेल तो
आता येईलच इतक्यात 
खिडकीआड डोळे लावून कोणी वाट पाहात असतं,
त्याला काय त्याचं? हे सगळं त्याच्या गावीही नसतं.
 
साधी चौकशी नाही, विचारपूस नाही,
तो येईल स्व:ला भिरकावून देईल,
मी आहे ह्याचा आनंद त्याला होण्यापेक्षा,
त्याच्या असण्याचा आनंद मला जास्त होईल.
 
मग थोडासा अल्ल्डपणा, उतावळेपणा त्याचा,
मध्येच थोडासा धुसमुसळेपणा, गंभिरपणा त्याचा,
फुलायचं की कोमेजायचं हे आपण ठरवूनही वागायचं नाही,
सोबत असली तरी तो एकटाच, आपण मात्र एकटं असूनही एकटं रहायचं नाही.
 
मग रात्र त्याची, गोष्टी त्याच्या,
आपण मनात वादळं घेवून ऐकत रहायचं,
त्याची नजर वळताच हळूच आंसू टिपायचे,
पुन्हा नजर वळे पर्यंत हसू घेवून तयार रहायचं.
 
सकाळ होताच तो त्याचा त्याच्या कामाचा
आपली साधी चौकशी नाही, विचारपूस नाही,
कधी येणार म्हणून आपण त्याच्याकडे आशाळभूत पणे विचारायला जावं,
त्या आधीच तो सांगून जातो ” लवकर यायला जमायचं नाही ! “
—————————————————————–

Follow

Get every new post delivered to your Inbox.