यंदाच्या
आभाळात पावसाचा ढग नाही
बाहेर सरी पडोत न पडोत
माझ्या मनात पाऊसंच नाही
मी उतरलोय खोल आत
ऋतूबदलांच्या पलीकडे, गच्च अंधारात
ज्या मनाला ओळखायचा पाऊस
त्याला मुद्दामचं ठेवलय बाहेर उंबरठ्यात
हे सगळं पाऊस पाहून गेलाय
गेल्यावर्षीच धाय मोकलून रडून गेलायो
इतक्या वर्षांच्या सोबतीची आठवण म्हणून
डोळ्यातलं पाणी घेवून गेलाय
आतला पाऊस बाहेर दाटेल
डोळ्यांऐवजी आभाळातनं फाटेल
ओळखीचा पाऊस पडणार नाही
माझ्या डोळ्यांतून झरणार नाही
आधी कसा पाऊस झोंबायचा
भिजवायला, अवखळ पाठलाग करायचा
जायचा, यायचा मनात माझ्या
तुकड्या तुकड्यांनी भरुन राहायचा
आता भरभरुन वाहिला तरी
मला पाऊस कळणार नाही
थोडासा थांबून हक्काने तो
वाट माझी वळणार नाही.



