Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘पाऊस’

तू म्हणतेस खरं पावसात जाऊया म्हणुन,

पण खरंच भिजायला जायचंय का?

ऑफिस मधली वेळ थोडी मागेपुढे होईल ग,

पुन्हा कधीतरी जाऊया, चालेल का?

तिशी पंचविशीत आलो आपण,

आता आपलं भिजायचं वय आहे का?

लोक पाहातील, कपडे भिजतील, वर सर्दी-ताप,

कशाला अकारण त्रास आणि आजारपण, नाही का?

बीच वर आताशा किती गर्दी असते, उगीचच!

त्यात चालायचीही सवय नाही, कंटाळणार नाहीस का?

भुट्टा, बर्फाचा गोळा, आजकाल अन्हायजिनीक असतात म्हणे,

डॉक्टर म्हणाले बाहेरचं खाऊ नका, विसरलीस का?

ट्रेकिंग, वॉटरफॉल, नको रे बाबा,

किती रिस्की असतं ते, स्लिपरी वगेरे,

रिसॉर्ट, पूल म्हणजे बेडकांएवजी बेवडयांच्या आरो़ळ्या,

ह्या सगळ्यात तुला भिजायला जायचंय का?

त्यापेक्षा तू घरीच थांब, सन्डे प्लान करुया का?

पाऊस नसला तर लंच बाहेर करुया का?

पावसांच्या कवितांची मी सीडी आणली आहे, लेटेस्ट,

घरात बसून दोघे जण पाऊस एन्जॉय करुया का?

Read Full Post »

आज तू हवी होतीस

पावसात भिजायला आज तू हवी होतीस

हातात हात घालून फिरायला आज तू हवी होतीस

बघ पाऊस कसा उतरतोय प्रीतीभरल्या ओढीनं

पानावरचे मोती वेचायला आज तू हवी होतीस…..

 

आज भिजताना पावसाचा एक ओघळ

माझ्या केसातुन डोळ्यावर ओघळला

मी डोळे मिटले सवयीनं

आणि डोळ्यातूनही एक ओघळ वाहिला…..

 

कळलंच नाही, किती वर्ष पाऊस आला आणि सरला

मी फक्त सोबत येऊन , तुझ्याच डोळ्यातनं पाहिला

म्हणूनच पाऊस आज अनोळखी अनोळखी झालाय

निदान ओळख करुन द्यायला तरी तू हवी होतीस….

 

तुला आवडतं ना पावसात पारिजातकात न्हायला

बकुळींच्या फुलांची पैंजण करुन ल्यायला

बघ तुझा लाडका मोगरा, पाऊस झोडपतोय;

त्या कळ्यांवर ओणवायला आज तू हवी होतीस……

 

तुझ्या सैलसर ओठांमधला खिडकीआडचा पाऊस

घट्ट मिटल्या मिठीमधला सागरी काठचा पाऊस

सगळं होतं तसंच आहे फक्त तू नाहीस

हे नसतं तरी चाललं असतं, आज तू हवी होतीस…..

Read Full Post »

Older Posts »

Follow

Get every new post delivered to your Inbox.