Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘मुखवटा’

निष्पाप माया करताना

उगाचच मी जीव लावला

तुरळकच राहिली अखंड नाती

तुकड्यांचाच भार जास्त झाला

 

ज्या धाग्यानं जोडायला जावं

तोच धागा नेमका तुटतो

गाठ मारणं जमतंच नाही

आणि गुंता वाढतच राहतो

 

आच्छादलं स्वतःला इतरांच्यावर

मी अंतर्बाह्य पसरुन घेतलं

पण कोमल फुलांच्या जाणीवांपेक्षा

मला काट्यांनीच जास्त ओरबाडून घेतलं

 

रक्ताळलेल्या जखमा

कालपरत्वे भरत राहतात

तरीही रोजच्या भेटीगाठीत

नवीन ओरखडे उठतंच राहतात

 

आधी माझी ओळख होती

पाणीदार डोळे नि हसरी चणी

आता मला ओळखतात लोक

उदास चेहरा नि डोळ्यात पाणी

 

मनात ठरवलं ढळायचं नाही

आसवांना समजावलं गळायचं नाही

चढवून घ्यायचा बेगडी मुखवटा

दु:ख कवटाळून बसायचं नाही

 

पण अजूनही अखंड नाती आहेत

निष्पाप सोबत साथी आहेत

मग स्वतःला बदलायचं कोणासाठी

ज्यांनी रडवलं त्यांच्यासाठी ?

 

मग पुन्हा ठरवलं बदलायचं

मनमोकळं हसायचं

बागडायचं स्वतःच्या आनंदासाठी

जगायचं प्रेमाच्या माणसांसाठी.

Read Full Post »

प्रत्येक वेळी हवा असतो मला

एक नवा मुखवटा घालण्यासाठी

लोकांच्यात वावरताना

लोकांना फसवण्यासाठी

 

कितीतरी जण भेटतात रोज

घृणास्पद, तिरस्कृत,आडमुठी

तरीही समोर जावं लागतं

स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी

 

अस्मितेला तडा देवून

वाकावं लागतं अशांपुढे

ज्यांना स्वतःला हिम्म्त हवी असते

मान ताठ करण्यासाठी

 

आतून एक , बाहेरुन एक

सगळं जगणं खोट्यासाठी

झुकतं माप घ्यावं लागतं

परिस्थितीशी जुळवण्यासाठी

 

एकदा वाटतं ओकावी समोरच्यावर

ही मनातली घाण, प्रचंड तिरस्कार

पण कदाचित समोरचाही वापरत असेल

माझ्यासारखाच मुखवटा, माझ्यासाठी.

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.